ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली   

पुणे : शहरात गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे ज्येष्ठ महिलेला उघडा नाला दिसला नाही. त्यामुळे या नाल्यात पडून ती ज्येष्ठ महिला वाहून गेली होती. तिचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सायंकाळी पाण्यातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
 
शोभा मनोहर महिमाने (वय ६५), असे त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या फुरसुंगी येथील रहिवासी आहेत. शोभा यांनी गुरूवारी कोल्हापूर ते पुणे असा प्रवास केला आणि त्या नवले पुलाजवळ उतरल्या. घरी जाण्यासाठी त्यांना रिक्षा पकडायची असल्याने त्या रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी, रस्ता ओलांडत असताना त्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्या आणि नाल्याच्या पाण्यातून वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी शोभा यांचा शोध सुरू केला. नवले पुलापासून सुरू होणार्‍या या नाल्यात शोध घेत असताना त्यांचा मृतदेह वारजे येथील स्मशानभूमीजवळ आढळला. त्यानंतर, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोभा यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पुढील तपासणीसाठी पाठवला. 

Related Articles